Saturday, March 19, 2011

पानिपत : यशाचे अपयशात रूपांतर

पानिपत २५० वर्षे


मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे - रविवार, ९ जानेवारी २०११

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण! २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो.

देशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.

दुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!

युद्धविजयी घटक


प्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.

लढाईपूर्व घटना


जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.

१७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.

संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

पानिपतमधील मोर्चाबंदी


भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.

मराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.

त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला. गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ लागले. डिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

व्यूहरचना आणि रणनीती


दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.

मराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी! त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजाउद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.

मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.

निर्णायक लढाई


अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.

दुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास!

युद्धतत्त्वांच्या निकषांवर परीक्षण


युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत.
या निकषांवर तिसऱ्या लढाईचे परीक्षण -

उद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)-
याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.

सुरक्षितता (Security)-
सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.

इच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)-
मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.

विस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)-
अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.

सैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of Force)-
युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.

सैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of Force)-
अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.

लवचिकता (Flexibility)-
नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.

सहकार्य (Co-operation)-
सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.

व्यवस्थापन (Administration)-
हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.

निर्णायक वळणे



पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील.

  • गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार.
  • अब्दालीचे यमुना उल्लंघन.
  • नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी.
  • एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि
  • राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.


सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर बऱ्याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.

पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठेजिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर मराठी झेंडा फडकला असता.

पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>