Friday, September 16, 2011

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा सहज सुंदर आविष्कार घडविणार्‍या " महाराष्ट्राच्या लोककला "


प्रस्तावना

॥श्री ज्ञानेश्वर॥

समृद्ध लोककलांचा वारसा या महारष्ट्राला लाभला आहे. मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या प्रवाह अखंडपणे वाहत आहे. महारष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रिकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती.

मौखिक परंपरेत नृत्य, नाट्य, संवाद, लोकगीते, लोकभूमिका यांचा सुरेख समन्वय साधला गेला. त्यातूनच म‍र्हाटमोळा लोकरंग उभा राहिला आणि या लोकरंगात मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहायला मिळाले. उद्‍भोदन, मनोरंजन आणि प्रबोधन घडवुन ’कळनारी भाषा आणि पेलणारे तत्त्व देणारे’ तसेच बोलीभाषेत वेदांतांचा अर्थ सांगून नैतिकतेची मूल्ये जनलोकात रुजविलेल्या या लोककला म्हणजे एक स्वतंत्र लोकविद्दापीठ आहे.

जनलोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे.ह्या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे अस्तित्व हे लोकजीवनाशी बांधलेले आहे. भारतात अनंत काळापासून नांदत आलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणार्‍या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते. लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. म्हणून लोकसंस्कृतीचा सहजसूंदर आविष्कार घडविणारी लोककला ही अनेक परिवर्तनातून आपला वाटा शोधीत शोधीत जनलोकात आपले स्थान टिकवून आहे.

महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमधे प्रामुख्याने कीर्तन, भारुड, लळित, दशावतार, गोंधळजागरण, भराड, लोकनाट्य, तमाशा, गण, गौळण, पोवाडा, भेदिक या लोककलांचा समावेश करावा लागेल. महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलांचे त्यांच्या प्रयोजनांवरुन चार प्रकारात वर्गिकरण करता येईल.

१) आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला, किर्तन, भारुड, लळित, दशावतार इ.
२) मनोरंजन पुरुषार्थ जागविणारी लोककला शाहिरी, पोवाडे, भेदिक इ.
३) लोकधर्माचे लोकाधार मांडणारी लोककला-गोंधळ, भराड, जागरण इ.
४) काहिशा शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटनारी लोककला-तमाशा, लोकनाट्य, गण, गौळ्ण इ.


मौखिक साहित्याच्या परंपरेतील लोकसाहित्याला नृत्य, नाट्य, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो. तेव्हा साहित्यातील लोकरंग कलेच्या अंगाने अविष्कार घेत घेत लोककला जन्म घेते. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरुपण प्रधान आहे. निवेदन, निरुपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते. म्हणून लोककलेतील नृत्य, नाटक, गीत हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यातील निरुपण, निवेदन, बतावणी यातून लोकमनाशी संवाद करीत करीत सहजपणे प्रबोधन घडविले जाते.
काळाच्या ओघात त्या लोककला लोप पावत चालल्या आहेत. विविध माध्यमातून आणि उपक्रमातून समाजाला संस्कारित करणा‍र्‍या संस्कारभारतीने या (2009) दैनंदिनीद्वारा लोकजीवन घडविणार्‍या लोककलांचा                       परिचय करुन दिला आहे. ह्या उपक्रमाचेही आपण मनःपूर्वक स्वागत कराल, यात शंका नाही.

- डॉ.रामचंद्र देखणे.



विविध लोककलाकारांची 
रंगभूषा, वेषभूषा, साहित्य, वाद्य



वासुदेव -

रंगभूषा : साधी, कपाळाला गंध, डोक्यावर मोरपिसांची शंखाच्या आकाराची टोपी, पायात घुंगराचे चाळ.
वेशभूषा : धोतर, घोळदार अंगरखा, उपरणं, काखेत झोळी, कमरेला शेला.
साहित्य : बासरी - कमरेला खोचलेली.
वाद्य : टाळ, चिपळ्या.

पोतराज -

रंगभूषा : मानेपर्यंत मोकळे केस, कपाळी कुंकवाचा मळवट, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात हिरव्या बांगड्यांची माळ, पायात खुळखुळ्याच्या स्वरुपाचे मोठे तोरडे, गळ्यात लक्ष्मी आईचा तांब्यांचा किंवा पत्र्याचा टाक, हातात दंडात कडं, मिशा.
वेशभूषा : धोतर, त्यावर रंगीबेरंगी खण बांधणे, कमरेला घागर माळ.
साहित्य : एकीकडे नारळासारखा आणि दुसरीकडे निमुळता होत जाणारा ३-४ इंच व्यासाचा कोरडा.
वाद्द : टाळ, चिपळ्या, पेटी, तबला

गोंधळी-

रंगभूषा :  साधी
वेशभूषा :  चुस्त पायजमा किंवा धोतर, पायघोळ झगा

रेणुराई -

रंगभूषा :गळ्यात माहुरच्य देवीचा टाक, कवड्यांची माळ, प्रत्येकी कवडीआड एक रेशमी गोंडा, कंगणीदार पगडी, कमरेला उपरणे, पायात घुंगरु, पोत दिवटीवर, संबळाला कापडाचा गाझा, संबळ दोन काड्यांनी वाजवतात
वाद्य : संबळ, तुणतुणं
साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

कदमराई -

गळ्यात तुळजापुरच्या देवीचा टाक, फ़क्‍त कवड्याची माळ, कवड्यांचा निमुळता शंखाच्या आकाराचा टोप, कमरेला उपरणे, पायात धुंगरु, पोत हातात, गाझा नाही, संबळ एका हाताने, एका कवडीने वाजवतात
वाद्य : संबळ, तुणतुणं
साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

वाघ्या-मुरळी -

रंगभूषा : वाघ्या - साधी, मुरळी - साधी, कपाळाला हळद, गळ्यात कवड्याची माळ, अंबाडा
वेषभूषा : वाघ्या - धोतर, सदरा, जाकीट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी (त्यात भंडारा म्हणजे हळद)
              मुरळी - नऊवारी पातळ
वाद्य : दिमडी, खंजीरी, तुणतुणं, टाळ, घाटी, डफ़
साहित्य : कोरंबा (वाघ्याचं भिक्षापात्र), तांबड वस्त्र, सव्वाशेर धान्य, दोन तांबे, नागवेलीची पानं, दोन नारळ, पाच ऊसफ़ुलांच्या माळा, पुर्‍या सोटार्‍यां, कडाकणीचा फ़ुलोरा.

लावणी -

रंगभूषा : स्त्री - थोडासा भडक मेकअप अंबाडा, त्यावर गजरा
पुरूष : साधी रंगभूषा.
सोंगड्या - स्त्री पेक्षा कमी भडक.
वेषभूषा - स्त्री-नऊवारी जरीच पातळ, गळ्यात, कानात, दंडात अलंकार, पायात चाळ.
पुरुष - पटका, चुस्त पायजमा सदरा.
वाद्य - ढोलकी, तुणतुणं, कडी, पेटी.

पोवाडा -

रंगभूषा - साधी.
वेशभूषा - पटका, चुस्त पायजमा, सदरा किंवा बाराबंदी, कमरेला झोला.
वाद्य - तुणतुणं, कडी, ढोलकी, डफ, खंजिरी.




वारकरी - दिंडी

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या महाराष्ट्राची सांस्कृतीक लोककला पुस्तकाधारे)


महाराष्ट्राचं लाडक दैवत पंढरपूरचा विठोबा. आषाढि-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोहचण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात. त्या त्या संतांची प्रतीके म्हणून चांदीच्या पादुका पालखित घालून टाळ मृदंगाच्या गजरात गावोगावचे वारकरी त्यात सहभागी होतात.संत द्यानेश्वर - आळंदी, निवृत्तीनाथ - त्र्यंबकेश्वर, सोपानदेव - सासवड, मुक्ताबाई - एदलाबाद, विसोबा खेचर - ओंढ्या नागनाथ, गोरा कुंभार - तेर, चांगदेव-पुणतांबे, भानुदास आणि एकनाथ - पैठण, तुकाराम महाराज-देहू, जगन्मित्र नागा-परळी वैजनाथ, राघव चैतन्य-आळंद गुंजौटी, केशव चैतन्य-ओतूर, बोधलेबुवा-धामगाव, मुकुंदराय-आंबेजोगाई, जोगा परमानंद-बार्शी, कान्होराज महाराज-केंदूर, संताजी जगनाडे-सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो या सार्‍या पालख्या वाखरी जवळ एकत्र येतात, विठूरायाच्या नामाने अवघे आसमंत भक्‍तिमय होऊन जाते. टाळमृदंगाच्या गजराने माणसाच्या मनात भक्‍ती जागृत होते.  हा गजर कानापासून मनापर्यंत, भूमीला स्पर्शून आकाशात जातो. वार्‍याच्या लहरीत मिसळतो. सूर्य किरणांच्या वर्षावात एकरुप होतो आणि विठ्‍ठलाच्या चरणाला येऊन बिलगतो.  आपणही कळत-नकळत या विलक्षण, दिव्य अनुभवांचा अंश बनतो.

पालखी बरोबरच्या एका अधिकारी, संत व्यक्‍तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा-राहणारा लोकांचा समूह म्हणजे दिंडी. ठराविक वेळेला देवाच्या भेटीला जाणे म्हणजे वारी. वारी करणारा वारकरी.

स्वत:चे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी स्वावलंबन शिकवते, समाजमनात मिसळायला शिकवते, वृत्तीतील ताठरपणा; अहंकार बाजूला सारुन अंतर्मुख व्हायला शिकवते, सर्वांशी एकरुप होऊन स्वत:कडे विनम्रता घ्यायला शिकवते, जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकवते. समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्ये मिळवता येतात.

आषाढी एकादशीला शयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने देव विश्रांती घेतात असा समज आहे.  म्हणूनच हे चार महिने चातुर्मासाचे विविध व्रत वैकल्ये करण्याचे मानले जातात.

विठ्ठलाच्या दर्शनातच सर्वसुख मानणार्‍या संतांनी विठ्ठल माऊली रुपात पाहिला आणि अनुभवला.  पालखी सोहळा महाराष्‍ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे.  नदी सागराला मिळून सागर रूप होते विठ्ठलभक्‍तीची ही गंगा विठ्ठलाशी एकरुप होते.  वारी एकसुरी नसते. त्यात नाट्य, गोलरिंगण, उभं रिंगण हि खास आकर्षण असतात.

पालखी राष्‍ट्रीय एकात्मतेची गंगोत्री आहे. खांद्यावरील पताका एकात्मतेचे प्रतिक आहे. संत समाजशिक्षण होते म्हणून त्यांनी पालखीसारख्या माध्यमांतून सामाजिक समतेची परंपरा प्रस्थापित केली.  हा अध्यात्मिक उन्नतीचा प्रवाह अविवेकाकडून विवेकाकडे, अविचारांकडून विचारांकडे, अद्न्यानाकडून द्न्यानाकडे, सूक्ष्मातून व्यापकत्वाकडे ऊर्ध्व दिशेने झेपावतो आहे. हेच वारीसोहळ्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे.



वासुदेव

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या महाराष्ट्राची सांस्कृतीक लोककला पुस्तकाधारे)

कर जोडोनी विनवितो तुम्हा
तुम्ही वासुदेव म्हणा
नको गुंतु विषय कामा
तुम्ही आठवा मधुसुदना ॥

न्या शास्त्राप्रमाणे मालकी हक्क देताना त्याचे मूल्य घेणे हा व्यापार आणि मालकी हक्काचा त्याग हे दान.  मराठी संतांनी वासुदेव, पांगुळ, पिंगळा, सरवदा, बाळसंतोष, जोशी या सतविचारांचे, विवेकाचे दान मागितले आहे. वासुदेव ही मराठी लोक संस्कृतितील सात्विक लोकभूमिका.  पहाटे येणारा वासुदेव रामनामाचा महिमा गातो आणि दान मागतो. त्याची वेशभूषा त्याच्या प्रबोधनाला साजेशी आहे.  अविद्येला घालवणारा श्रीविद्येचा मोरपिसांचा मुकुट डोईवर आहे.  विश्वाला व्यापणार्‍या पूर्ण द्न्यानाचा पायघोळ अंगरखा आहे. ब्रह्ममाया प्रकृति पुरूष या देवोदेवीची चिपळी त्याच्या हातात आहे.  नादब्रह्माचा पावा तो वाजवत आहे.   भोग सोडून त्यागाचे दान तो मागतो आहे.

वासुदेवाला लोक संस्कृतितील भागवत संप्रदाय म्हणतात.  वासुदेवाच्या रुपाने संतांनी भक्‍तिचे दान मागितले. जीवन-मुक्‍तीचा आनंद सांगितला.  परमेश्वाराच्या व्यापक स्वरुपाची ओळख करुन दिली. विकार मुक्‍त होऊन सत प्रवृत्तीवर वाटचाल करण्याचा मार्ग सांगितला.  अंगणात येणार्‍या वासुदेवाला दान दिले की तो सर्व देवदेवतांची नावे घेत ’दान पावलं’ असं म्हणत गिरकी मारतो आणि म्हणतो.........





दान पावलं दान पावलं ॥
भीमशंकरी महादेवाला ।
कोल्हापुरी महालक्ष्मीला ॥
पंढरपुरी विठुरायाला ।
जेजुरीमंदी खंडेरायाला ॥
देहुगावी तुकयाला ।
आळंदीमंदी द्न्यानोबाला ॥
पैठणमंदी एकनाथाला ।
सज्जनगडी रामदासाला ॥
सदगुरुरायाला दान पावलं ।
जनता जनार्दनाला दान पावलं ॥



गोंधळी

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या महाराष्ट्राची सांस्कृतीक लोककला पुस्तकाधारे)

चौरंगावर गव्हा-तांदूळाचा चौक भरलाय. त्यावर कलश ठेवलाय. आंबा आणि विड्याच्या पानांनी तो सुशोभित केलाय.  डोक्यावर कंगणीदार पिळाची पगडी, अंगात मखमली अंगरखा, गळ्यात कवड्यांच्या माळा, कपाळावर हळदीकुंकवाचा मळवट भरलेला, एकाच्या हातात तुणतुणे, एकाकडे संबळ, एकाच्या हातात टाळ असे गोंधळी आलेले आहेत. चौकाभोवती शाळूच्या ताटांचे मखर उभे आहे.  पोत पेटविला आहे.  जोर्जोरात संबळ वाजू लागतो आणि गोंधळाला सुरवात होते. देव-देवतांना गोंधळाला आवाहन दिलं जातं. वाद्य-संबळ, तुणतुणं, झांजा, टाळ अशी पारंपारिक वाद्य आहेत.
गोंधळ्यांचे रेणुकराई किंवा रेणुराई आणि कदमराई असे दोन प्रकार आहेत.  रेणुकेचे उपासक रेणुराई तर तुळजाभवानीचे उपासक ते कदमराई. या शिवाय महाराष्‍ट्रात मराठे, कुंभार, ब्राह्मण व अकरमासे अशा गोंधळ्यांच्या पोट जाती आहेत.  या संस्थेची प्राचीनता १००० ई.स. पूर्वीची आहे असे मानले जाते.
खुद्द गोंधळी आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुकेपासूनची आहे असे सांगतात. त्यासाठी ’रेणुका महात्म्य’ चा आधार देतात.  महाराष्‍ट्राच्या लोकधर्मात आणि लोकसंस्कृतीच्या घडणीत ’लोकधर्माचा पुरोहित’ असे गोंधळ्यांचे स्थान आहे. महाराष्‍ट्राची स्फ़ुर्ती देवता आणि कुलस्वामिनी भवानी देवी.  या आदिशक्तीचे उपासक आणि भगत म्हणून लोकप्रिय असणारे गोंधळी मराठी लोकसंस्कृतीचे वारसदार आहेत.

उदे ग अंबे उदे ॥
गोंधळ मांडिला देवा गोंधळा यावे
तेहतीस कोटी देवा गोंधळा ये
साती समंदरा गोंधळा ये
नवलाख तारांगणा गोंधळा ये
धरीती माते गोंधळा ये
आकाशी पिता गोंधळा ये
भक्तांच्या गणा गोंधळा ये
राहिले साहिले देवा गोंधळा ये
उदे ग अंबे उदे ।
तुळजाभवानी उदे । रेणुके अंबे उदे ॥
आई तुझं लेकरु आम्ही ।
आलो शरणं तुझ्या ग चरणी ।
हो प्रसन्न भवानी माते ॥ उदे ग अंबे उदे।
किती गाऊ आईचा महिमा ।
पडे समिंदराला सीमा ।
कसा घालावा गोंधळ ।
करावा मायेचा जयजयकार ॥ उदे ग अंबे उदे।


भुत्ये


भुत्या हा गोंधळ्याप्रमाणेच देवीचा भक्त असतो. माहुरची रेणुका आणि तुळजापुरची भवानी ही ह्या भक्तांची आराध्य देवता.  जगदंबा ही आदिशक्तीच्या स्वरुपात तीन ठिकाणी वास करते.  माहूर, सौंदत्ती व तुळजापूर अशी यांची श्रद्धा असते.  भुत्या, भोप्य व आराधी ही तीनही नावे एकाच अर्थाची आहेत. हे सर्व देवाचे भक्त गोंधळ्यांप्रमाणे गोंधळ घालतात.

भुत्याचा वेष : लांब घोळदार पायपितचा तेलकट मळकट अंगरखा-डोर, डोक्यावर शंकूच्या आकाराची कवड्याची टोपी, गळ्यात माळा, कमरेला कवड्या लावलेला कमरपट्टा, मनगटात कवड्याच्या मनगट्या, गळ्यात कवड्यांनी मढवलेली हळद-कुंकवाची पिशवी, डाव्या खांद्यावर लोंबणारी बुधली, एका काखेत झोळी, छातीवर देवीचा भला मोठा पितळी टाक,  पायात घुंगरु, कपाळावर हळद-कुंकवाचा मळवट, हातात पेटता पोत, साथीला संबळ्या असा भुत्या नाचत येतो.

संत एकनाथांच्या भुत्याने देहाहंकारी वृत्ती टाकून देऊन भेदभावाला आणि द्वैतबुद्धिला नाहिसे करुन सत्त्वगुणांची आरती केली आणि त्या जगदंबेला भावभक्तीचा व सतविचारांचा फ़ुलवरा बांधला म्हणूनच देवीची उपासना करुन मनोरंजन करणे एवढी मर्यादित भूमिका न ठेवता सतभक्तांच्या रुपातील संत एकनाथांचा भुत्या हा एक श्रेष्ठ प्रबोधनकार आहे.


पोतराज

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या ’गोंधळ परंपरा स्वरुप आणि आविष्कार’ पुस्तकाधारे)
कडक लक्ष्मीला पोतराज म्हंटले जाते. पोतराजांना एक ठराविक पोत/प्रांत नेमून दिलेला असतो.  त्या साठी त्यांना एक सनद मिळालेली असते. द्रविड भाषेत पोस्तु म्हणजे रेडा किंवा बकरा. त्यावरुन पोतुराज शब्द बनला.  त्याचा अपभ्रंश पोतराज.  याचे मुख्या वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पोतनृत्य.  पोतराज पायात घुंगरू बांधून संबळीच्या तालावर नृत्य करतो आणि थोड्याशा जागेतील पदन्यासाने तसेच अभिनयाने देवीच्या लीला आणि चरित्र उभे करतो.

काही पोतराज निरक्षर असतात आणि हातांच्य बोटांवर बसवलेली करपल्लवी भाषा त्यांना अवगत असते.  पोतराज दारोदारी जाऊन ’बये दार उघड’ म्हणत अंगावर कडाक्याचे फ़टके मारुन घेतो. महाराष्‍ट्रात मरीआईचा उपासक म्हणून पोतराज रुढ आहे.





वाघ्य-मुरळी

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या ’गोंधळ परंपरा स्वरुप आणि आविष्कार’ पुस्तकाधारे)

जेजुरीचा खंडोबा ही महाराष्ट्राची लोकप्रिय लोकदेवता या लोकदेवतेचे उपासक वाघ्या-मुरळी. यांना लोकसंस्कृतीत एक आगळे वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. खंडेरायाचे हे भक्त देवापूढे जागरण करुन खंडोबाची लीला वर्णन करण्याचे काम करतात.

पिवळं पातळ, कपाळावर भंडारा, पदराला बांधलेली घंटी वाजवत मुरळी नाचते आणि हातात दिमडीघाटी घेऊन मुठी-मुठीने भंडारा उधळतात ’हब हब हब’ म्हणत नाचनारा वाघ्या तिला साथ करतो. रंगीत पाटावर वस्त्र मांडून त्यावर विड्याच्या पानांचा खंडोबा व देवाचे टाक ठेवले जातात. शेजारी बुधली दिवटी मांडतात. गणपती म्हणून सुपारी ठेवतात. टाळ, तुणतुण, घाटी यांचा नाद घुमतो. जागरण मोडलं जात. पाच उसांच्या मखरात प्रतीकात्मक देवांची स्थापना करुन वाघ्या मुरळी हे जागरण मांडतात. देवदेवतांना जागरणाला आवर्तन दिल्यावर खंडोबाची लीला वर्णन करणारी गाणी म्हटली जातात.

अपत्य प्राप्तीसाठी देवाला नवस करणारे लोक मुले होताच पहिले मुल खंडोबाला अर्पण करत असतात. त्यातील मुलगे ’वाघ्या’ आणि मुली ’मुरळी’ बनत. मुरळीचे लग्न खंडोबाशी लागते. मुरळी आणि देवाला हळद लावतात. गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात. दोघांवर भंडारा उधळतात. या विधिला ’गाठा फोडणे’ असे म्हणतात.

बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वाघ्या-मुरळी संस्थेतही बदल होतो आहे. मुलं खंडोबाला अर्पण करण्याची प्रथा आता राहिलेली नाही. त्यामुळे खंडोबाचे उपासक पुरुष आणि स्त्रिया जागरण करतात.

येळकोट येळकोट जय मल्हार
हाब हाब हाब ।।
जेजुरीच्या खंडेरायाच्या जागरणाला या या
वाईच्या तू गणराया जागरणाला या या
बानूबाईच्या मल्हारराया जागरणाला या या ।।
येळकोट येळकोट जय मल्हार
मल्हार रायाचं नाव घेत हो
चढून जातो भक्त गडा
येळकोट येळकोट गजरामंदी वाजतो चौघडा ।।
नवलाख पायरी गडाला हो खंडोबा रायाला
मल्हारी मल्हारी देव हा मल्हारी
भक्तांचा देव हा कैवारी देव हा मल्हारी ।


भारुढ

(डॉ. रामचंद्र देखणे यांच्या ’गोंधळ परंपरा स्वरुप आणि आविष्कार’ पुस्तकाधारे)



समाजात आढळणार्‍या लोकभूमिकांच्या माध्यमातून काहिश्या नाट्यमय रुपात भारूड वाड्मयाला महाराष्ट्रातील संतांनी आकार दिला. प्रतीकात्मक भूमिकांमधून रुपात्मक पध्दतीने तत्त्वज्ञाची मांडणी करुन नीतीचा उपदेश संतांनी केला. त्यासाठी ’बहुरुढ’ म्हणजे भारुढ वाड्मयाचा उपयोग केला.

मराठी भाषेत अनेक संतांनी भारुढे लिहिली. पहिले भारुढ संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. संत एकनाथांनी भारुढाला लोकभिमुख बनविले. लोकाभिमुकांच्या माध्यमांतून, लोकभाषा आणि लोक वाड्मय यांच्या नाट्यमय लोककलेच्या प्रकारातून गेयता आणि विनोदातून अध्यात्म, नीतिकल्पना, प्रबोधन नाथांनी आपल्या भारुढातून केले. भारुढाला लोककलेच्या स्वरुपात नाथांनी नटविले. भारुढ रंगभूषेबरोबर नाट्य स्वरुपात सादर केले गेले म्हणजे त्याला ’सोंगी भारुढ’ म्हणतात. भारुढ नुसते गाउन दाखवत नाही. त्याची संपादणी करतात. म्हणजे भारुढ गातांना सोंगांच्या तोंडी संवाद किंवा भाषण टाकावे लागते. हा सोंगी भारुढाचा एक प्रकार आहे.

जनमनोरंजनाची साधणे म्हणुन शतकानुशतके लोकशिक्षण व स्वधर्मजागृतीचे कार्य भारुढांनी केले. अध्यात्मिक उपदेश, नीतीकल्पना सांगतांना नृत्य, नाट्य, संवाद, संगित आणि लोकभूमिकांचा रुपात्मक अविष्कार घडविणारी भारुढे मनोरंजनातुन लोकशिक्षण घडवितात.

सामान्य माणसाच्या जिवनातील विकार-वासना, दुष्ट प्रवृत्ती नाहिशा होऊन त्यांचे जिवन सुखि व्हावे म्हणून तोच तो विवेक विचार समाजाच्या मनात रुजवला. विंचू चावला म्हणजे आत्यंतिक वेदना होतात. मग क्रोधादी षड्‍रिपूंचा विंचु चावला तर त्याच्या वेदना किती गंभिर होतील हा विचार ’विंचु’ या भारुढात नाथांनी वर्णन केला आहे. रुपात्मक पध्दतीने विकरांपासून दूर राहण्याचा उपदेश नाथांनी ’विंचु’ मध्ये केला आहे.

अग ग ग ग ग.......... कय झालं गं ? मनुष्य इंगळी अति दारुण
विंचु चावला काय मी करु ? मज नांगा मारिला तिनं
विंचु चावला विंचु चावला विंचु चावला होऽ ।। सर्वांगी वेदना जाण.....त्या इंगळीची ।।२।।

विंचु चावला वृश्चिक चावला । या विंचवाला उतारा
काम क्रोध विंचु चावला तमोगुण मागे सारा
तम घाम अंगाशी आला सत्वगुण लावा अंगारा
पंचप्राण व्याकुळ झाला विंचु इंगळी झराझरा ।।३।।
त्याने माझा प्राण चालला
सर्वांगाचा दाह जाहला ।।१।। सत्त्व उतारा घेऊन
अवघा सरिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण
शांत केली जनार्दने ।।४।।



भजन

ईश्वरभक्तीसाठी सर्व संतांनी विविध अभंगांची रचना केली. अभंग, गौळणी, हरिपाठ यांचे गायन होऊ लागले. अभंग वृत्त चार तुकड्यात असते.  १०-१५ अक्षरांचा एक असे तीन तुकडे, शेवटचा अगदी लहान ४ ते ८-१० अक्षरांचा तुकडा असतो.  त्यात द्विपदात्मक व चतु:ष्पदात्मक असे दोन प्रकार आहेत.  द्विपदात्मकात दोन खंडात कडवे संपते.
उदाहरणार्थ :
द्विपदात्मक :
रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥
चतु:ष्पदात्मक :
सदा माझे डोळा । जडो तुझी मूर्ती ॥
रखुमाईच्या पती ।  सोयरीया ॥

अभंगाच्या दुसर्‍या कडव्यात पहील्या ओळीत अभंगाचा विषय, अभंगाचे सार सांगितलेले असते. त्याला ’धृपद’ म्हणतात.  त्यानंतर तालाची ’तोड’ घेतली जाते. शेवटच्या कडव्यात अभंग रचणार्‍याचे नाव असते. त्याला ’मुद्रा’ म्हणतात.  रुपपर, मागणीपर, उपदेशपर, मार्गदर्शनपर, विरहिण्या, गौळणी असे अभंगाचे विषय आहेत.

भजनाची सुरुवात जयजयकाराने होते. त्यानंतर नमनाचे श्लोक असतात.  नंतर पुन्हा जयजयकार आणि नंतर ’रामकृष्ण हरी’ चे भजन सुरु होते.  त्यानंतर रुपपर, मागणीपर अभंग म्हंटले जातात.  पहिले ५ अभंग कोणते म्हणायचे ते ठरलेले असतात.  त्याला ’पंचपदी’ म्हणतात.  बुक्का लावल्यानंतर कोणतेही अभंग म्हणणे संमत असते.  सर्व अभंग म्हंटल्यानंतर ’गौळणी’ म्हणतात.  कृष्ण, गोपी, राधा, गोकूळ, कृष्णलीला यावर आधारीत अभंग म्हणजे ’गौळणी’. भजनाचा शेवट भैरवीने होतो.  शेवटी परत जयजयकार करतात.  महाराष्‍ट्रात भजन परंपरा भक्तिपूर्ण व परिणामकारक म्हणून प्रसिध्द आहे.


प्रवचन

वैचारिक भाग संगीत विरहीत केवळ ज्ञानप्रसारासाठी आसनस्त होऊन करतात. त्यासाठी वेदोपनिषदात काही सूत्रे किंवा एखादा उपदेशपर अभंग किंवा ज्वलंत धार्मिक, सामाजिक विषयावर विवेचन करणे याला प्रवचन म्हणतात.





कीर्तन

’कीर्तन’ महाराष्‍ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत महत्वाचा भाग आहे.  लोकजागृतीचे उत्तम साधन आहे.  स्त्री-पुरुष, नागरी-ग्रामीण, साक्षर-निरक्षर या सर्वांचे मनोरंजनातून शिक्षण देणारी किर्तन परंपरा आहे.  स्त्रीशिक्षणाचा आणि स्त्रीचं भावविश्व समृध्द करण्याच महत्वपूर्ण कार्य कीर्तन परंपरेने शतकानुशतके केलेल आहे.

कीर्तन परंपरा वेदकाळापासून चालत आलेली आहे. गान आणि विवेचन यांच्यातून कीर्तन जन्मले.  सामान्य माणसाची वासना, दुष्‍ट विचार, विकार दूर होऊन आनंदी व्हावा म्हणून संतांनी आदर्श, नीतीमूल्य सांगितली.  ही नीतीमूल्ये कीर्तनकारांनी समाजात रूजवली.  कीर्तनामध्ये गायन-वादन, नाट्य-अभिनय, नृत्य-विनोद, यांचा एकत्रित समावेश असतो.  कीर्तनामधून लोकांचे उद्‍बोधन, प्रबोधन आणि जागृती करण्याचे काम कीर्तनकार करतात.
कीर्तनाचे वारकरी, नारदीय, हरिदासी, रामदासी, कैकाडी, भराड, हरिकथा असे विविध कीर्तन प्रकार संप्रदायाप्रमाणे सांगता येतील.  तसेच गुणसंकीर्तन, लीलासंकीर्तन, नामसंकीर्तन, असे प्रकार आहेत.
       वारकरी कीर्तन महाराष्‍ट्रातील खेडापाडयापर्यंत जाऊन प्रबोधनाचे काम करत आहेत. वारकरी कीर्तनात पूर्वरंगातील निरुपणाला प्राधान्य दिले जाते.  त्यामध्ये नितीमूल्ये व शुध्द तत्वांची माडणी केली जाते.

       नारदीय कीर्तनाचे वैशिष्‍ट्ये म्हणजे पूर्वरंगात निरुपण व उत्तरंगात रसभरीत आख्यान.  या कीर्तनकारांना हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात.  या कीर्तनाने साकी, दिंडी या वृत्तांबरोबरच कटाव, चूर्णिका, कडाका, छंद अशी नवी वृत्ते निर्माण केली.  या नारदीय कीर्तनातूनच संगीत नाटकांची परंपरा सुरु झाली असावी.

       रामदासी कीर्तनकार राष्‍ट्रधर्म जागवतात.  कैकाडी किंवा गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तनकार अति सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या बोली भाषेत नीतीबोध सांगतात.  पशुबळी, जातीभेद, व्यसनाधीनता अशा सामाजिक विकृतींवर आक्षेप घेऊन प्रबोधन करतात.

नाटय, नृत्य, संगीत, विनोद यांचा मिलाफ़ करुन एकपात्री प्रयाग म्हणजे कीर्तन.  कीर्तनाने देवाशी नाते जोडताना माणसातील देव शोधला.  माणसामाणसातील देव्यत्वाचे जागरण म्हणजे कीर्तन.  भक्तीचे सामाजिकरण, देवाचा शोध,  मानवतेचा बोध हे कीर्तनाचे प्रयोजन आहे.


तमाशा - लावणी

महाराष्‍ट्राच्या लोकजीवनाशी एकरुप झालेला मनोरंजनाचा लोककला अविष्कार म्हणजे तमाशा, लावणीचा स्त्रोत मांगल्याच्या कथा गीतात आढळतो.  इसवी सनाच्या पहिल्या शतकात राजा सातवाहनांच्या वंशातील ’हाल’ नावाच्या कलाप्रेमी राजाने ’रतिनाट्य’ निर्माण केले. यात तमाशाची बीजे आढळतात.  संत ज्ञानदेवांच्या काळी ’गंमत, खेळ तमाशा’ या नावाने हा प्रकार माहित होता.  उत्तर पेशवाई काळात तमाशाला राजाश्रय मिळाला.  श्रृंगार प्रधान लावण्यांच्या बरोबरच दर्जेदार लावण्या, सवाल-जवाब लिहून आणि सादर करुन शाहीर रामा जोशी, होनाजी बाळा, अनंत फ़ंदी, प्रभाकर, संगनभाऊ, परशुराम पठ्ठेबापुराव या सार्ख्या शाहीरांनी अनेक लावण्या लिहिल्य.  तमाशात त्या सादर केल्या आणि लावणी प्रकार लोकप्रिय केला.  पेशवेकालीन तमाशात गण, गौळण, लावणी, भेदीक मुजरा असे पाच प्रकार सादर करत असत.  उमा बाबूने पहिला वग-मोहना बटाव लिहिला.  आणि तमाशात वगनाट्य सादर होऊ लागले.  पठ्ठेबापूरावांनी गण, गौळण, लावणी, भेदीक यांची दर्जेदार रचना करुन त्यांना उंची मिळवून दिली.  लोकशाहीर अणाभाऊ साठे यांनी तमाशाचे रुपांतर लोकनाट्यात केले.  त्यातून ’तमाशा’ या लोककलेला चळवळीचे रूप देण्याचा प्रयत्‍न केला.
लावणीने गणाची लावणी, अध्यात्मिक लावणी, गवळण ही रुपे गोंधळातून स्विकारली.  प्रणय किंवा श्रृंगार हा वाघ्या-मुरळीतून घेतला.  लोक रंजनाबरोबर लोक शिक्षण घडवण्याचे काम तमाशाने केले.  खुमासदार पदलालित्य, रसपोषक हावभाव, लयबध्द शब्दरचना, ताल धरायला लावणारे संगीत यामुळे लावणी लोकप्रिय झाली.



No comments:

Post a Comment

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>