Wednesday, June 29, 2011

सावरकरांचे आंबेडकरांना आमंत्रण

सावरकरांचे आंबेडकरांना आमंत्रण:

श्रीयुत डा.आंबेडकर यासी,

महाशय,

गेली पाच-सहा वर्षे रत्नागिरी नगरात पोथीजात जातिभेदोच्छेदक आंदोलन बर्याच मोठ्या प्रमाणावर चालू आहे.आपल्या हिंदुधर्माच्या नि हिंदुराष्ट्राच्या मुळासच लागलेली ही जन्मजात म्हणविणार्या पण पोथीजात असणार्या जातिभेदाची कीड मारल्यावाचून तो संघटित नि सबळ होऊन आजच्या जीवनकलहात टिकाव धरू शकणार नाही,याविषयी मलाही मुळीच शंका वाटत नाही.आपल्याप्रमाणेच नि आपल्या इतक्याच स्पष्ट शब्दात मी अस्पृश्यता प्रभृति अन्याय्य,अधर्म्य नि आत्मघातक अशा अनेक रूढींची ब्याद पसरविणार्या या जन्मजात जातिभेदास निषेधीत आलो आहे.सोबत माझे दोन तीन लेखही धाडीत आहे:वेळ झाल्यास पाहावेत.

परंतु हे पत्र मी जातिभेदाविषयी शाब्दिक निषेध वा चर्चा करण्यासाठी धाडीत नाही. या पिढीत हा जातिभेद मोडण्यासाठी हिंदु समाज प्रत्यक्ष कार्य असे कोणते करु इच्छितो याची काही सक्रिय हमी,प्रत्यक्ष पुरावा,मनोवृत्ती पालटल्याची निर्विवाद साक्ष आपणांस हवी आहे,असें आपण मसूरकर महाराजांशी झालेल्या भेटीत बोलल्याचे समजते. अस्पृश्यता व जातिभेद मोडण्याचे दायित्व स्पृश्यांवरच काय ते नाही. अस्पृश्यंतही अस्पृश्यता नि जातिभेद यांचे प्रस्थ स्पृश्यांइतकेच आहे.

भट नि भंगी जातिभेदाच्या पापाचे भागीदार असून मनोवृत्ती पालटल्याची साक्ष दोघांनीही एकमेकांना दिली पाहिजे.

दोघांनी मिळून हे पाप निस्तरिले पाहिजे.

दोष सगळ्यांचा,प्रमाण काय ते थोडे फार.

अर्थात जातिभेद मोडण्याचे प्रत्यक्ष कार्य तिथेच उत्कटपणे नि यथार्थपणे झाले असे म्हणता येईल की,जिथे ब्राह्मण मराठेच महाराबरोबर जेवत नाहीत ,तर महारही भंग्याबरोबर जेवतो.

जाति-अहंकाराच्या प्रपीडक वृत्तीपासून महारही इतका मुक्त नाही की,त्यांनी केवळ स्पृश्य वर्गापासूनच काय तो मनोवृत्ती पालटण्याविषयी सक्रिय पुरावा मागण्याचा निरपराधी अधिकार गाजवू पहावा हे माझ्याप्रमाणेच आपल्याही अनुभवास पदोपदी आलेले असेल.

नुसती शाब्दिक सहानुभूति नको.आता सक्रिय हमी काय देता तें रोखठोक करुन काय तें करून दाखवा ?हे आपले मागणे न्याय्यच नव्हे तर उपयुक्तही आहे.

मीही गेल्या पाच-सहा वर्षांपासून’रोख-ठोक हेच काय ते कार्य’ हे सूत्र हिंदुराष्ट्रापुढे इतर

प्रकरणी तसेच सामाजिक क्रांतीविषयीही ठेवत आहे.

तें सूत्र व्यवहारविण्याचा नि जन्मजात जातिभेद प्रत्यहीच्या आचरणात तोडून दाखविण्याचा प्रयोग माझ्या मते रत्नागिरी नगरात मोठ्या प्रमाणात नि त्याखालोखाल मालवण नगरात यशस्वी झाला आहे.

प्रयोग हा प्रयोगशाळेतील एका कोपर्यात जरी यशस्वी झाला; तरी त्यामुळे सिद्ध होणारी शक्यता नि नियम हे सर्वसामान्य असल्याने तो त्या प्रमाणात यशस्वीच समजला पाहिजे.

यासाठी आपण मागितलेला सक्रिय पुरावा,’काय करता ते दाखवा’ची मागणी,रत्नागिरीचा जाति-उच्छेदक पक्ष आपल्यांपुरती तरी आपणांस कृतीनेच देऊ इच्छित आहे.

यास्तव त्या पक्षाच्या वतीने हे आमंत्रण मी आपणांस धाडीत आहे.

जातिभेद तोडण्याचा बहुतेक व्यावहारिक कार्यक्रम रोटीबंदी तोडण्यात सामावलेला असतो.

जो रोटीबंदी तोडतो तो वेदोक्तबंदी वा स्पर्शबंदी तोडतोच तोडतो.

बेटीबंदी तेवढी उरते,पण ती काही प्रत्येकी प्रत्येकाला तोडण्याची गोष्ट नव्हे.

वधूवरांचाच तो पृथक प्रश्न.

इतरांनी तसा मिश्रविवाह धर्मबाह्य वा बहिष्कार्य मानला नाही नि त्या जोडप्यास इतर विवाहितांप्रमाणेच संव्यवहार्य मानलें,म्हणजे संपले.

यास्तव जातिभेद व्यवहारात तोडीत असल्याचा कोणत्याही वेळी,घाऊक प्रमाणात झटकन देता येईल असा,निर्विवाद पुरावा म्हणजे त्यातल्या त्यात रोटीबंदी प्रकटपणे तोडून दाखविणे हाच होय.

हें ध्यानात घेऊन आपल्या आगमनाचे प्रसंगी साधारण कार्यक्रम ठेऊ.


  1. आपण एका पंधरवड्याचे आत-बाहेर सवडीप्रमाणे रत्नागिरीस यावे.येण्याचे आधी एक आठवडा आगाऊ कळविण्याची तसदी घ्यावी.

  2. पतितपावनामध्ये देवळाच्या भर सभामंडपात सरासरी एकहजार ब्राह्मण,मराठा,वैश्य,शिंपी,कुळवाडीप्रभृति अनेक स्पृश्य मंडळींचे ,प्रतिष्ठित प्रमुख नागरिकांपासून,तो कामकर्यांपर्यंत सर्व वर्गांचे स्पृश्यांसह ज्यांत अस्पृश्य महार,चांभार मंडळी जेवतात इतकेच नव्हे तर महार,चांभार,मंडळी भंगीबंधूंसहित सरमिसळ पंगतीत बसतात --असे टोलेजंग सहभोजन आपल्या अध्यक्षतेखाली होईल.अशी सहभोजनें श्री राजभोज,पतितपावनदास सकट इत्यादि पूर्वास्पृश्यांचे समक्ष नि सह अनेकवार झाली आहेत.

  3. आपली इच्छा असल्यास स्त्रियांचेही एक सहभोजन होईल.त्यात ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्यादिक प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया -प्रौढ नि तरुण-आपल्या महार,चांभार,भंगी प्रभृति धर्मभगिनींच्यासह पंगतीत सरमिसळ जेवतील.

  4. या सह्भोजकांची नांवे प्रकटपणे वर्तमानपत्री प्रसिद्धिली जातील.ही अट मान्य असणारासच सहभोजनांत घेतले जाईल.

  5. येथील भंगी कथेकर्याची किंवा आपणासोबत कोणी सुयोग्य पूर्वास्पृश्य कथेकरी येतील तर त्यांची कथा रात्री होईल.देवळात इतर कथेकर्यांप्रमाणेच त्या भंगी कथेकर्यास ओवाळून रीतीप्रमाणे त्याचे पायीही शेकडो आब्राह्मण-चांभार[ब्राह्मणांपासून चांभारापर्यंत] मंडळी दंडवत करील.श्री.काजरोळकर यांचा तसा सन्मान गेल्या गणेशोत्सवी केला होता.

  6. आपली इच्छा प्रतिकूल नसल्यास आपलेही एक व्याख्यान व्हावे असा मानस आहे.

  7. कार्यक्रमाची जागा पतितपावन मंदिर,श्रीमंत भागोजी शेट कीरांच्याच सत्त्तेचे आणि सहभोजनादिक प्रकरणी अनुकूल तेच भाग घेणार.त्यामुळे तिसर्या कोणाचाही संबंध तिथे पोहचणार नाही.आणि म्हणूनच नैर्बंधिक[कायदेशीर] अशी कोणतीही अडचण येण्याचा संभवसुद्धा नाही.

  8. हो,सर्वात महत्वाची गोष्ट अशी की,अशी लहान मोठी दीड्शेवर सहभोजने इथे झाली असताही नांवे छापून भाग घेणार्या हजारो सहभोजकांपैकी कोणाच्याही जातीने कोणासही जातिबहिष्कार्य ठरवलेले नाही.उलट सहभोजन हवे त्याने केले वा केले नाही,तरी तो प्रश्न ज्याचात्याचा,ते जातिबहिष्कार्य कृत्य नव्हेच हेंच आज येथील धर्मशास्त्र होऊन बसले आहे! ती वस्तुस्थितीही आपण समक्ष अवलोकालच.
    • हा कार्यक्रम झाला म्हणजे हा राष्ट्रीय प्रश्न सुटला असे मानण्याइतका कोणीही मूर्ख नाही.पण तशाने वार्याची दिशा कळते;आपणास काही सक्रिय आरंभ हवा आणि जर सहा हजार वर्षांच्या बलवत्तर रूढी सहा वर्षांत एवढ्या प्रमाणावर इथे केवळ मन:प्रवर्तनाने मोडता येतात तर इतरत्र येतीलही अशी निश्चिती वाटण्यास हरकत नाही,-एवढ्याचसाठी आम्ही हे आमंत्रण देत आहोत.

    • आम्ही हिंदु,आपण हिंदु या पिढ्यान्पिढ्याच्या धर्मबंधुत्वाच्या स्मरणासह हृदयात जे उत्कट ममत्व उत्पन्न होते त्या ममत्वाने हे अनावृत प्रकट निमंत्रण धाडीत आहे.

    • आपला माझा काही वैयक्तिक स्नेहही आहेच.त्या स्नेहासाठी म्हणून तरी हे प्रेमपूर्वक आमंत्रण स्वीकारावे.

    • आमच्या पक्षाच्या दोघा तिघा प्रमुख पुढार्यांच्या सह्या ह्या पत्रावर त्यांच्याही उत्कट इच्छेस्तव घेऊन हे पत्र धाडीत आहोत.


कळावें लोभ असावा ही विनंती.

- वि.दा.सावरकर

- डा.शिंदे

- रा.वि.चिपळूणकर (M.A. LL.B.)

- दत्तोपंत लिमये (B.A.,LL.B.)

- संपादक,सत्यशोधक



पुनश्च:-


या पत्रातील आमंत्रण स्वीकारण्याची इच्छा आपण उत्तरी दर्शविल्यास येथील जातिउच्छेदक पक्षीय शम्भर प्रमुख नि प्रतिष्ठित अशा सर्वजातीय नागरिकांच्या सह्यांचे प्रकट आमंत्रणही आपणांस रीतसर धाडू.कळावे.लो.अ.ही वि.

आपला,

- वि.दा.सावरकर

[निर्भीड,दि.१७/११/१९३५]



डा.आंबेडकरांनी खालील उत्तर धाडले-


’रत्नागिरीला आपण जे कार्य करीत आहात त्याची माहिती वाचून आनंद होत आहे.येथील ला कालेजच्या कामामुळे मला आपल्या आमंत्रणाचा लाभ घेता येत नाही याविषयी खेद वाटतो.’

[सकाळ-दि.२४-११-१९३५]

No comments:

Post a Comment

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>